kiranvbhide

अंतर्नाद दिवाळी अंक २०१८

Share
  • Ships within 8 days
250
Description

तेवीस वर्षांच्या वाटचालीनंतर यंदा अंतर्नाद मासिकाचे प्रकाशन बंद झाले असले तरी वाचकांच्या आग्रहानुसार अंतर्नादचा दिवाळी अंक मात्र प्रकाशित होणार आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या कला शाखेचे डीन म्हणून निवृत्त झालेले डॉ. निशिकांत मिरजकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. ललिता मिरजकर यांनी तब्बल तीस वर्षे तिथे अध्यापन केले. त्यांचे अनुभव अंकातील ‘दिल्ली विद्यापीठाची दुनिया’ ह्या लेखात आहेत. ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉम्रेड डांगे यांच्याविषयी लिहिले आहे नरेन्द्र चपळगावकर यांनी. एक अनुवादक म्हणून श्रेष्ठ कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्याशी असलेल्या स्नेहाला उजाळा दिला आहे उमा कुलकर्णी यांनी. सत्यजित रे यांचे नायक म्हणून विख्यात असलेल्या अभिनेते सौमित्र चटर्जी यांच्याविषयी लिहिले आहे विजय पाडळकर यांनी.

हेमंत गोविंद जोगळेकर यांनी आपल्या नुकत्याच दिवंगत झालेल्या पत्नीच्या अंतिम आजारपणाविषयी लिहिले आहे ‘मोटर न्युरोन डिसीजचा राक्षस’ या लेखात. दुर्गा भागवत आणि इंदिरा गांधी यांच्यातील आश्चर्यकारक साम्यस्थळांविषयी लिहिले आहे अंजली कीर्तने यांनी. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी चित्रकार सुहास बहुळकर यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे महेंद्र दामले यांनी.

झाडांशी असलेले आपले नाते उलगडत आहेत दत्ता दामोदर नायक आपल्या ‘झाडे’ या ललितलेखात. हंस, मोहिनी आणि नवल ह्या नामांकित दिवाळी अंकांचे संपादक आनंद अंतरकर यांचे सात रसरशीत ललितलेख समाविष्ट असतील ‘सप्तक : सात लघुललिते’ या शीर्षकाखाली. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, आणि किशोरी आमोणकर यांच्याविषयी लिहिले आहे विनय हर्डीकर यांनी ‘आमचा संगीतप्रेमाचा त्रिकोण’ या लेखात.

अफगाणिस्थानातील अनुभवांवर लिहीत आहेत प्रतिभा रानडे (‘आक्रोशांचे अवकाश’). देशमुख प्रकाशनची धुरा ज्यांनी अनेक वर्षे सांभाळली त्या उद्योजक रवींद्र गोडबोले यांच्याविषयी लिहीत आहेत रवींद्र शोभणे (‘कधीतरी बोलता आलं असतं...’). याशिवाय ह्रेरंब कुलकर्णी (ग्रामीण दारिद्रयाची शोधयात्रा), विजय पांढरीपांडे (आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी जबाबदाऱ्या), दीपक करंजीकर (भारताचा सांस्कृतिक नकाशा), अनंत लाभसेटवार (भारताचं जगातील स्थान), माणिक खेर (शोध आनंदाचा), उषा टोळे (वृद्धाश्रम आणि मी) आणि गणेश मनोहर कुलकर्णी (चकवा) यांचेही लेख अंकात असतील.
कथाविभागात असतील नागनाथ कोतापल्ले (सारंगपूर दंगल : शोध आणि वार्तांकन), रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ (अदिती अखिलची गोष्ट), उमाकान्त घाटे (लती) आणि अलका कुलकर्णी (जिलेबी) तर अनुवादित कथा आहेत अवंती महाजन (चष्मे), मधुकर धर्मापुरीकर (एकटेपणाच्या कथा), सुमती जोशी (कृष्णचूडा) आणि रंजना पाठक (जनक-जननी) यांच्या.

याशिवाय संपादक भानू काळे स्वतः लिहित आहेत शून्यातून सुरुवात करून गद्रे मरीन वर्क्स ही भारतीय मत्स्यउद्योगातील आघाडीची कंपनी उभारणारे रत्नागिरीचे दीपक गद्रे यांच्याविषयी.